म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

(हि सर्व माहिती आहे आपल्या माणसान्न साठी पाठवत आहे मी कुठला पण एजेंट नाही,व कुठला अर्थ सलाहकार नाही,मला जेवडे माहिती आहे ते शेयर करत असतो .....)


म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

११ मित्र होते, त्यांना भाड्याने घर घ्यायचे होते. त्यांनी मिळून एक माणूस नेमला. त्या माणसाचे नाव आपण MF पकडू. MF चे काम आहे की तो सर्वांसाठी घर शोधेल. घरमालकाशी, बोलणी करेल, भाडं पण तोच ठरवेल. ११ मित्रांकडून दरमहा भाडं जमा करेल. घरमालकांना ते घरभाड नेऊन देईल.
इथे MF थोड्या फी मध्ये, सर्व लोकांची सारखी असलेली समस्या सोडवत आहे. त्यामुळे त्या ११ मित्रांना आता घर शोधण्याची चिंता राहिली नाही. ते आपल्या कामावर लक्ष देऊ शकत होते.
MF = MUTUAL FUND
तसंच काहीसे म्युच्युअल फंड मध्ये आहे. म्युच्युअल फंड ही सर्वांची एक समस्या सोडवतो, ती म्हणजे “गुंतवणूक कुठे करावी ?” इथे जसे ११ मित्र मिळून एकत्र आले. तसेच म्युच्युअल फंड मधे होते. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंड कडे येतात.
काही गुंतवणूकदारांना पैसे काही दिवसांकरिता गुंतवायचे असतात, काहींना काही महिने, काहींना काही वर्ष आणि काहींना तर अनेक दशके. मग गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजांनुसार म्युच्युअल फंडमध्ये योजना दिल्या जातात. लोक आपले पैसे म्युच्युअल फंडकडे देतात, मग म्युच्युअल फंड ठरवतात की पैसे कुठे गुंतवायचे. याबदल्यात ते काही फी घेतात.
सोप्या भाषेत, जे काम तुम्हाला करायला जमत नाही, ज्यात तुम्हाला अनुभव नाही, ज्या कामाचे तुम्ही तज्ञ नाही, ते काम दुसऱ्याला करायला देणे. उदाहरण डॉक्टर, ड्रायवर, आचारी आणि म्युच्युअल फंड. गुंतवणुकीचे तुम्ही तज्ञ नसल्यामुळे आणि तुम्हाला याचा अनुभव नसल्यामुळे, हे काम आपण अशा संस्थेला सोपवणे, जी हेच काम इतर लोकांसाठी पण करते. तर अशी संस्था आहे म्युच्युअल फंड.

म्युच्युअल फंड चे फायदे कोणते ?

तज्ञ

तज्ञ म्हणजे असा व्यक्ती ज्याला एखाद्या क्षेत्राचे ज्ञान आहे किंवा एखाद्या क्षेत्रात लागणारे कौशल्य त्यात आहे.
म्युच्युअल फंड मध्ये तज्ञ व्यक्तीची फंड मॅनेजर म्हणून निवड करण्यात येते. अशा व्यक्तींना सहसा १५-२० वर्ष गुंतवणूक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असतो. फंड मॅनेजर हे पूर्ण वेळ याच क्षेत्रात काम करतात. त्यामुळे त्यांना या क्षेत्राबद्दल चांगले ज्ञान असते.
सामान्य माणसाला आपला नोकरी-धंदा करून, कुठे ? किती ? गुंतवणूक करावी आणि कधी विकावी ? या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे कठीण जाते. त्यामुळे तज्ञ व्यक्तीकडून आपले काम करून घेणे सहसा फायदेशीर ठरते.
तुम्ही कधी वजन कमी करण्याचा प्रयत्न केलाय का ? तुम्ही म्हणणार मला वजन कमी करायला डायटीशिअन ची गरज नाही, मला जिम मध्ये बॉडी बनवायला कोच ची गरज नाही. २-३ वर्ष जातात, तरी आपले वजन काही कमी होत नाही वा आपली बॉडी काही बनत नाही.
काही लोक नक्कीच तज्ञाविना हे काम करू शकतात. पण त्यांना हे काम तज्ञांएवढं चांगलं करायचं असेल, तर त्यांना स्वतःलाच तज्ञ बनाव लागतं. आपण सर्व गोष्टीचे तज्ञ बनू शकतो का ? आपल्याकडे तेवढा वेळ आहे का ?
म्युच्युअल फंड मधे एक तज्ञ – ज्याला या कामाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. तो तुमची गुंतवणूक सांभाळतो. ....

Diversification (वैविध्यपुर्णता)

म्युच्युअल फंडमध्ये, गुंतवणूक हि अनेक जागी केल्या जाते, म्हणून गुंतवणूक हि वैविध्यपूर्ण असते. त्यामुळे धोका कमी होतो. समजा तुमची पूर्ण गुंतवणूक एकाच प्लॉट मधे आहे, फक्त सोन्यातच आहे किंवा फक्त तुमच्या व्यवसायात आहे. अशा वेळेस, तुमच्या गुंतवणुकीवर काही संकट आले तर फार नुकसान होईल. याउलट जर तुमची गुंतवणूक वैविध्यपूर्ण असेल आणि एका गुंतवणुकीवर संकट आले, तर तुमचे जास्त नुकसान होणार नाही. झालेलं नुकसान दुसरी गुंतवणूक भरूनही काढू शकते.

Liquidity (तरलता)

म्हणजे किती सहजपणे तुम्ही गुंतवणूक विकू शकता. तरलतेबद्दल सविस्तर माहिती आपण गुंतवणुकीचे प्रकार या लेखात पाहिली आहे. समजा तुमची गुंतवणूक घर किंवा जमीन मध्ये आहे आणि तुमच्यावर काही संकट आल्यामुळे तुम्हाला थोड्या मोठ्या रक्कमेची गरज आहे. अशा वेळी पटकन घर विकून रक्कम मिळवणे हे सोपे काम नाही. पण म्युच्युअल फंड मध्ये हे काम फारच सोपे आहे. साधारणतः ४-५ दिवसात तुम्हाला तुमची रक्कम परत मिळते. काही म्युच्युअल फंड च्या योजना मध्ये तर तुमची रक्कम लगेच IMPS द्वारे तुमच्या खात्यात जमा होते.

परतावा

तज्ञ आपली गुंतवणूक सांभाळत असल्यामुळे परतावा चांगला मिळतो. तसेच म्युच्युअल फंडद्वारे तुम्हाला इतर व्यवसायात, बॉण्ड मध्ये गुंतवण्याची संधी मिळते, जिथे परतावा जास्त मिळू शकतो. म्युच्युअल फंड च्या काही योजनांमध्ये तर २० वर्षात १०० पट परतावा मिळाला आहे. म्हणजेच १ लाख गुंतवलेले २० वर्षात १ करोड झाले आहेत. परतावा बद्दल सविस्तर माहिती आपण पुढील येणाऱ्या काही लेखात पाहू.

व्यवसाय न करता व्यवसायाचे मालक व्हा.

म्युच्युअल फंड चा सर्वात मोठा फायदा हा की, व्यवसाय न करता व्यवसायाचे मालक व्हा. TATA, MARUTI, RELIANCE, GODREJ, HUL यासारख्या इतर कंपनीचे तुम्ही अप्रत्यक्षपणे मालक होऊ शकता. तुमचे पैसे म्युच्युअल फंड यांसारख्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे या कंपणींना होणारा फायदा हा तुमचा फायदा होतो. आपल्या देशातील कंपनी आता विदेशात माल विकू लागल्या आहेत. भारतातील औषधी अमेरिकेत विकल्या जातात. भारतातील कंपनी युरोप आफ्रिकेत गाड्या विकतात. भारतातील बासमती तांदूळ पूर्ण जगात जातो. आपल्या देशातील कंपनी ह्या प्रगती करत आहे. त्यांच्या प्रगतीमध्ये सहभागी होवून आपण आपली संपत्ती वाढवू शकतो.

भारतीय कंपनींचे भविष्य चांगले का असू शकते ?

भारत हा युवकांचा देश आहे. भारताची ६५% लोकसंख्या ३५ वर्षाखालील आहे. तरुण लोक म्हणजे देशाची काम करणारी जनता. एवढे लोक तरुण आहेत, म्हणजे देशात काम करणाऱ्यांची कमी नाही. हे लोक काम करतील, जास्त कमावतील आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता कंपनी आणखी उत्पादन करतील. तरुण लोकसंख्या असल्यामुळे हि जनसंख्या फक्त बसून खाणारी नसेल तर काम करणारी असेल. भारत जवान होत असताना इतर देश म्हातारे होत असतील. २०२० मध्ये भारतीय जनसंख्येच वय २९ वर्ष असेल. त्याचवेळी चीन चे ३७ आणि जपान चे ४८ असेल. यावरून आपल्याला असे दिसून येते भविष्यात इतर देशांपेक्षा आपल्या देशात युवा जास्त असल्यामुळे आपल देश ताकतवर असेल आणि प्रगती करेल. या प्रगती मध्ये अनेक कंपनी फार मोठ्या होतील. फार पैसा बनवतील. या देशाच्या प्रगतीमध्ये आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून सहभागी होवू शकतो.

म्युच्युअल फंड सुरक्षित आहे का ?

SEBI हि सरकारी संस्था म्युच्युअल फंड च्या कामकाजावर लक्ष्य ठेवते. पण कोठे गुंतवणूक करावी ? हे म्युच्युअल फंड स्वतःच ठरवतात. SEBI जरी लक्ष्य ठेवत असेल, तरी किती परतावा मिळेल ? हे SEBI ठरवत नाही. SEBI चे काम म्युच्युअल फंड पारदर्शकरित्या काम होत आहे का नाही हे पाहणे आहे. त्यासाठी SEBI वेळोवेळी दिशानिर्देश देते. गुंतवणूकदारांच्या हिताच रक्षण करण्याच काम SEBI करते. TELECOM क्षेत्रात जसे TRAI, विमा क्षेत्रात IRDA, बँक क्षेत्रात जसे RBI तसेच काहीसे काम SEBI म्युच्युअल फंड क्षेत्रात करते. SEBI कडून परवानगी मिळाल्यावरच म्युच्युअल फंड आपला व्यवसाय सुरु करू शकतात. म्युच्युअल फंड च्या Trustee ची नेमणूक SEBI च्या परवानगीने होते...............
अजून माहिती पुढच्या ब्लॉग वर.....

No comments:

Post a Comment

Start-up Street: Social justice and the start-up ecosystem

Disparities in start-ups are a global phenomenon and affirmative action is needed to ensure an equal opportunities environment for aspiring...